राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांना आज आणि उद्या 30 डिसेंबर रोजी जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येणार आहे.
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांना आज आणि उद्या 30 डिसेंबर रोजी जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणूनच आज २९ डिसेंबर आणि उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्णक्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश देतानाच सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

