कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

0 झुंजार झेप न्युज

 कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत.

नवी दिल्ली : ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू (New Corona Strain in UK) आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती (New Corona Strain) अद्याप भारतात कुठेही आढळलेली नाही, अशी माहिती निती आयोगाच्या आरोग्य विभागाने नुकतीच दिली आहे. त्यातच देशाची चिंता थोडी कमी करणारी एक बातमी समोर आली आहे. (Corona Vaccines will work against the Strain detected in UK)

भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन (K Vijay Raghavan) यांनी सांगितले की, कोरोनावरील लस ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नव्या स्ट्रेनवरही प्रभावी ठरेल. कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. परंतु लस मिळेपर्यंत प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी.

केंद्र सरकारने देशासह जगभरातील कोरोनाच्या परस्थितीविषयी माहिती देताना सांगितले की, देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दर दिवशी 17 हजारांहूनही कमी नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती बरी आहे. तसेच देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्यांदेखील घटली आहे.

नवा कोरोना व्हायरस किती घातक?

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. “नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं.

देशात आपत्कालीन वापरासाठी कोणत्या लसीला केंद्राकडून मंजुरी मिळणार?

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही देशांमधील नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येणार याकडे लागले आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीला मंजुरी मिळू शकते.

कंपनीद्वारे काही आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यावरुन हा लसीच्या वापराला सरकारकडून लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. भारताचं लक्ष सध्या ब्रिटनकडे आहे. कारण ब्रिटनने या लसीच्या आपत्कालीन वापराला अद्याप मंजुरी दिलेली नाही. ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही त्यदृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात.

जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की, जानेवारी (2021) महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला (प्रभावशीलता) आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Minister of Health Harsh Vardhan) यांनी गेल्या रविवारी कोरोनावरील लसीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात देशातील नागरिकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.