सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं आहे, अशी टीका बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली.
पुणे: माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी आता एल्गार परिषदेची (Elgar parishad ) नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्याचा मानस बी.जी. कोळसे-पाटील (b g kolse patil) यांनी व्यक्त केला आहे.
ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे बी.जी. कोळसे-पाटील यांनी सांगितले. हे सरकार मनुवादी विचारांनी ग्रासले आहे. सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं आहे, अशी टीका बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली.
लोकांनी एल्गार परिषदेचा हेतू समजून घेतला पाहिजे. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगलीचा काही संबध नाही. आम्हाला ऑनलाईन परिषद घ्यायला सांगता. तुम्ही मात्र सभा घेता. एल्गार परिषदेचा तपास खोटा असल्याचा दावाही यावेळी बी.जी. कोळसे-पाटील यांनी केला. यापूर्वी पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली होती. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत स्वारगेट पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.
एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात का?
डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं. या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.
118 याचिका दाखल
शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा गजहब झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत.
ब्राह्मण महासंघाचा विरोध
31 डिसेंबरला स्वारगेट येथील गणेश कला क्रीडात दिवसभराची ही परिषद होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह काही कलाकृतींचे प्रदर्शन याठिकाणी लावलं जाईल. जेष्ठ विचारवंत अरुंधती रॉय या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिन अभियान समितीसह 200 ते 300 समविचारी संघटना यात सहभागी होतील. मात्र ब्राह्मण महासंघाने या परिषदेला विरोध दर्शविला आहे. विचार करूनच या परिषदेला परवानगी देण्यात यावी, असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितलं.

