टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खाननं मेलबर्न कसोटीमधील भारताची कमजोर बाजू मांडलीय.
मुंबई: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia vs India) दुसऱ्या कसोटीत 8 विकेटने विजय मिळवून मालिकेत जोरदार कमबॅक केलं आहे. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खाननं भारतीय टीमला इशारा दिला आहे. मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानं भारतीय संघातील उणिवांवर पडदा पडला. जर, त्या गोष्टी भरुन काढल्या नाही तर सिडनी कसोटीत त्या भारतीय संघाला महागात पडू शकतात, असं झहीर खान म्हणाला.
चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारताची कमजोरी
टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खाननं मेलबर्न कसोटीमधील भारताची कमजोर बाजू मांडली आहे. त्या कमजोरीवर मार्ग काढावा लागेल, असं झहीर खान म्हणाला. झहीर खाननं भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारताची कमजोरी असल्याचं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारतासाठी चिंतेचे कारण बनला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा ऑसी गोलंदाज पॅट कमिन्सच्या विरोधात अडखळताना दिसला.
चेतेश्वर पुजाराला पॅट कमिन्सच्या विरोधात संघर्ष करावा लागतोय ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे, असं झहीर खान म्हणाला. पुजारानं मागील दौऱ्यावर असताना कसोटी मालिकेत सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या. मात्र, सध्या सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील चार डावांपैकी तीनवेळा पुजाराला बाद पॅट कमिन्सनं बाद केले. पुजारा या मालिकेत एकही अर्धशतक करु शकलेला नाही.
पुजारा कमबॅक करेल
चेतेश्वर पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब असली तरी तो लवकरच कमबॅक करेल, असा विश्वास झहिर खानने व्यक्त केला आहे. पुजाराला त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल करावा लागेल, असं झहीर खान म्हणाला.
उमेश यादव भारतात परतला
दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा गोलंदाज उमेश यादव भारतात परतला आहे. उमेश यादवला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागले होते. उमेश यादव बंगळुरुमध्ये उपचार घेणार आहे. उमेश यादवनं सामन्यातील 8 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकला. यानंतर उमेश रनअपमध्ये लगंडताना दिसला. उमेशला हॅमस्ट्रिंग इंज्युरीचा त्रास जाणवला. यामुळे तडक टीम इंडियाचे फिजीओ मैदानात आले. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे ही उर्वरित ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली.

