वाहन सुस्थितीत असल्याशिवाय रस्त्यावर आणू नका, कल्याण वाहतूक पोलिसांचं आवाहन
कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यात भर म्हणजे रस्त्यावर बसेस बंद पडत असल्याने नागरीक आणि वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत.
ठाणे : कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यात भर म्हणजे रस्त्यावर बसेस बंद पडत असल्याने नागरीक आणि वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. ना दुरुस्त बसगाड्या रस्त्यावर चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केडीएमटी, एनएमटी आणि राज्य परिवहन महामंडळास केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्ते विकास आणि पूल बांधणीची कामे सुरु आहे. कल्याण शीळ फाटा रस्ता, कल्याण वालधूनी, कल्याण-मुरबाड, कल्याण भिवंडी याठिकाणी विकास कामे सुरु आहेत. नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यात भर म्हणजे काही खाजगी आणि सरकारी बस गाड्या रस्त्यात बंद पडत्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.
कल्याणमध्ये आज सकाळपासून तीन बस बंद पड्ल्याच्या घटना घडल्या. एक खाजगी बस कल्याण वालधूनी पूलावर बंद पडली. दुसरी एनएमटीची बस कल्याण पत्री पूलाजवळ बंद पडली. संध्याकाळी केडीएमटीची बस कल्याण मुरबाड रोडवर बंद पडल्याने नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. कल्याण मुरबाड रोडवर बंद पडलेल्या बसमधून धूर निघत असल्याने प्रवासी घाबरले होते.
“खाजगी आणि सरकारी वाहन चालकांनी कोणतेही वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी ते सुस्थितीत आहे की नाही याची शहानिशा केल्याशिवाय ते रस्त्यावर आणू नये. वाहन रस्त्यात बंद पडल्यास वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांसह प्रवासी, नागरीक आणि पोलिसांना होतो. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची बस रस्त्यात बंद पडल्यास त्याचा त्रास होतो. गाड्या दुरुस्त पाहिजेत ही जवाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा डेपो चालक जबाबदार आहे. आज एका दिवसात तीन ठिकाणी बस बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत”, अशी माहिती कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी सुखदेव पाटील यांनी दिली.

