चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार
नाशिकच्या सामानगाव रोड परिसरात राहणाऱ्या रामजी यादव या 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे.
नाशिक : चोरीच्या घटनेमुळे हत्येचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. चोरी भलत्यांनीच केली पण घटना लपण्यासाठी एका 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. चोरीची घटना उघडकीस येऊ नये म्हणून नाशिकमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाला ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे घरा शेजारी राहणाऱ्या इसमानेच हा प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सामानगाव रोड परिसरात राहणाऱ्या रामजी यादव या 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत रामजी बाहेर गेला होता. याचवेळी रामजीसोबत असलेल्या इसमाने एका व्यक्तीला चाकू दाखवून लूटमार केली. सदर घटना रामजीने पाहिली होती. हीच घटना तो घरी सांगेल म्हणून शेजारी राहणाऱ्या इसमाने या चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या चिमुरड्याची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी आपल्या घरी आला. रामजीला मी घरी सोडलं होतं. मात्र, तो कुठे गेला माहिती नाही असं त्याने घरच्यांना सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले तेव्हा संपूर्ण सगळं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे तर अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर चोरीच्या या घटनेमध्ये मुलाचा नाहक बळी गेल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

