भाजप आमदाराच्या भाच्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. या बातमीमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये गोंधळ उडाला आहे.
जालना : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदाराच्या भाच्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. या बातमीमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये गोंधळ उडाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भाच्याला दोन वर्षासाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. आरोपी दीपक डोंगरे याच्या विरोधात जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याच्या हिंसक कारवाया दिवसेंदिवस वाढत असल्याच्या आरोपावरून पोलिसांकडून उपविभागीय अधिकारण्याकडे पाठवण्यात आला होता. यावरून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा दोन वर्षे हद्दपारीचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी आमदार नारायण कुचे यांच्यापासून आपल्याला धोका असल्याची तक्रार या भाच्याने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून आमदार कुचे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अधिक माहितीनुसार, एक महिला घाणेरड्या भाषेतील ‘मेसेज’, फोठो पाठवत असल्याची तक्रार दीपक लक्ष्मण डोंगरे याने दोन मार्च 2020 ला चंदनझिरा पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी सदर महिलेचा जवाब नोंदवला.
यानंतर पोलीस गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं सांगत डोंगरे यांनी खंडपीठात याचिका सादर केली. यानंतर खंडपीठातूनही कारवाई करण्याचे आदेश आल्यानंतर डोंगरे यांनी यामध्ये आमदार नारायण कुचे यांनाही गोवले. या तक्रारीवरून ‘मेसेज’ पाठवणाऱ्या महिलेसोबतच आमदार नारायण कुचे व इतर एक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण यानंतर कुचे यांच्या विनंती आणि याचिकेनंतर त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

