शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावली आहे . त्यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीच्या या नोटीसवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. मात्र, त्यांची ही टीका हास्यास्पद असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे.
भाजपची भूमिका नेमकी काय?
“कर नाही त्याला डर असायचं काही कारणच नाही. हा जो काही कांगावा सुरु आहे की, राजकीय द्वेष बुद्धितून हे सर्व केलं जातंय तर हा मोठा जोक आहे. देशात जी न्यायालये आहेत त्यांची दरवाजे कुणीही ठोकू शकतं. त्याला काही अडचण नाही. शिवसेनेने लोकशाही, नैतिकतावर बोलावं? ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या घरावर हल्ला केला, निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला, विशेष म्हणजे त्याचं समर्थन संजय राऊत आणि शिवसेनेने केला, त्यांनी नैतिकता बाबत बोलूच नये”, असा घणाघात भाजप नेते अतुल भातकळकर यांनी केला.
“ईडीची नोटीस आलेली आहे. ईडी सिलेक्टिव्ह कारवाई करते, असं त्यांचं म्हणणं हास्यास्पद आहे. परवाच आमदार रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे ज्यांचा विधानसभेत भाजपला पाठिंबा आहे त्यांची 350 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. हे गेल्या महिन्याभरात घडलेली घटना आहे. त्यामुळे ईडी भाजपविरोधी कारवाई करते हे वस्तुस्थितीला धरुन नाही. माझं संजय राऊतांना एवढाच सल्ला आहे, कांगाऊखोरपणा करु नका. कर नाही त्याला डर कसला. निर्भयतेने कायद्याला सामोरे जा”, असं भातकळकर.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
“मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
काँग्रेसची भूमिका काय?
“भाजपचे जे अलिशान कार्यालये आहेत त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावे. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधी आहेत म्हणून जुने प्रकरण उकळून काढून केवळ त्रास दिला जातोय. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं,”अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.
“प्रताप सरनाईक यांचं प्रकरण बघितलं तर 2014 साली टॉप सेक्युरिटीला एमएमआरडीएने कंत्राट दिलं. 2017 साली ते पुन्हा दिलं गेलं. त्यावेळी फडणीस सरकार होतं. फडणवीस एमएमआरडीएचे अध्यक्ष होते. त्यांनी स्वत: कंत्राट दिलं. पण ते का दिलं म्हणून त्यांना विचारलं जात नाही.”

