मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कात नव्या पाहुण्याचं (वाघाचं) आगमन झालं आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यावर्षीची शेवटची मन की बात केली. या मन की बातमध्ये मोदींनी वाघ आणि बिबट्यांटा संदर्भ देत त्यांची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. योगायोगाने मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कात नव्या पाहुण्याचं (वाघाचं) आगमन झालं आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या वाघाचे आगमन होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वनक्षेत्रात बंदिस्त करण्यात आलेल्या आणि त्यानंतर गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या आरटी-1 या सात वर्षे वयाच्या वाघाला काल नॅशनल पार्क मध्ये आणण्यात आले.
आरटी-1 वाघाने मुंबईच्या राजीव गांधी नॅशनल पार्कात येण्यासाठी तीन दिवस सलग प्रवास केला. त्यामुळे सध्या वाघ विलगिकरणात आहे. कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून त्याला विलगीकरमात ठेवण्यात आल्याचं पार्क प्रशासनाने सांगितलं.
27 ऑक्टोबरला चंद्रपूरमधील राजुरा येथे हा वाघ पकडण्यात आला होता. त्याला पकडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. ऑक्टोबरमध्ये त्याला पकडण्यात वन विभागाला यश आले होते. 2019 पासून त्याने 8 नागरिकांना ठार मारले तर तिघांना जखमी केलं होतं. सध्या नॅशनल पार्कमध्ये पाच वाघिणी आणि सुलतान हा पाच वर्षांचा नर वाघ आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या वर्षातील देशवासियांशी शेवटची मन की बात केली. यावेळी त्यांनी वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्य्त केलं. मोदी म्हणाले, “देशात वाघांच्या आणि बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात बिबट्यांची संख्येत वाढत आहे. तसंच महाराष्ट्र देखील बिबट्यांच्या संख्येत तिसऱ्या स्थानावर आहे. मागील काळात वाघांची संख्या कमी होत होती. परंतु आता वाघ-बिबट्यांची संख्या वाढते आहे ही समाधान देणारी गोष्ट आहे”.

