सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक प्रतिनियुक्तीवर : देवेंद्र फडणवीस

0 झुंजार झेप न्युज

 सुबोध कुमार जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचाकल प्रतिनियुक्तीवर गेल्याचा आरोप त्यांनी केला.

नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बदलीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजी प्रतिनियुक्तीवर गेले असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जयस्वाल पुन्हा एकदा केंद्राच्या सेवेत गेले आहेत. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून जयस्वाल केंद्रात गेल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पोलीस महासंचालकांच्या प्रतिनियुक्तीवरुन हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की, "राज्याला एक कार्यक्षम पोलीस महासंचालक लाभले होते. मात्र गेले अनेक महिने राज्य सरकारचा जसा कारभार चालला, त्यांना विश्वासात न घेता पोलीस विभाग चालवले गेले, हे पहिल्यांदाच घडले, त्यालाच कंटाळून ते राज्य सोडून प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. पोलिसिंग हे स्वतंत्र विभाग आहे. पोलीस दल गृह विभागाच्या अखत्यारित येत असलं तरी आपण त्याला स्वायत्तता दिली आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं सुपरव्हिजनचं आहे. मात्र आता गृह विभागात छोट्या छोट्या बदलीसाठी हस्तक्षेप सुरु आहे. त्यामुळेच महासंचालकांनी प्रतिनियुक्तीवर जाणं पसंत केलं. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडत आहे. हे राज्याला भूषणावह नाही. पोलीस विभागात लोक येतात, जातात, मात्र नक्कीच पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल.

ठाकरे सरकार आणि पोलीस महासंचालकांमध्ये नाराजी

गेल्या काही दिवसात आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून ठाकरे सरकार आणि सुबोध कुमार जयस्वाल यांच्यात नाराजी झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. केंद्र सरकार आणि ठाकरे सरकारने त्याला हिरवा कंदील दिल्यानंतर जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्तीवर झाली आहे.

नववर्षात महाराष्ट्राला नवीन पोलीस महासंचालक

सुबोध कुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नववर्षात नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत. त्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण?

1. बिपिन बिहारी - 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, गृहनिर्माण विभागाचे प्रमुख आहेत

2. हेमंत नगराळे - 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या त्यांच्याकडे कायदा विभागाची जबाबदारी आहे.

3. संजय पांडे - 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते होमगार्ड विभागाचे प्रमुख आहेत.

4. रश्मी शुक्ला - 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी, नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत

महासंचालकपदी मराठी चेहरा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार पोलीस महासंचालकपदी एका मराठी चेहर्‍याला पसंती देऊ शकते. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे मिळूनच अंतिम निर्णय घेतील. पण सध्यातरी हेमंत नगराळे यांच्या नावाला शरद पवारांची पसंती मिळू शकते.

बिपिन बिहारीही आघाडीवर

पोलीस महासंचालक पदाच्या रेसमधील दुसरं नाव आहे बिपिन बिहारी. बिहारी हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना दहशतवाद्यांकडून धोका होता. तेव्हा बाळासाहेबांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला पण बिपिन बिहारी यांनी बाळासाहेबांना विनंती करुन सुरक्षा घेण्यात सांगितलं. तेव्हापासून बिहारी आणि ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत. पण येत्या दीड-दोन महिन्यात बिहारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते महासंचालक झाले तर त्यांना मुदतवाढ द्यावी लागेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.