काँग्रेसकडून मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी नागपूर महापौर पदासाठी अर्ज केला आहे.
नागपूर : नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. नागपूर महापौर निवडणुकीसाठी (Nagpur Mayor Election) काँग्रेसने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. नागपुरात भाजपचा महापौर बसणे निश्चित असतानाही काँग्रेसने दोघांना तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नागपूरचे मावळते महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्या राजीनाम्यानंतर पुढील महापौराच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नागपूर महापालिकेतील 151 सदस्यांपैकी काँग्रेसचे अवघे 29 नगरसेवक आहेत. तर 108 नगरसेवकांसह भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरात काँग्रेसचा महापौर बसणे अशक्य आहे.
काँग्रेसकडून रिंगणात कोण?
काँग्रेसकडून तरीही मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीची परंपरा पुन्हा एकदा समोर आली आहे. दुसरीकडे भाजपकडून दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) महापौर पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून मनीषा धावडे (Manisha Dhawade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतही संघर्ष
नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी असला, तरीही सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर नागपुरातील सर्व जागा स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी आधीच दिला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी 21 डिसेंबरला पदाचा राजीनामा दिला. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा 13 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दयाशंकर तिवारी महापौर राहतील, असं सूत्र ठरलं होतं.
तेलही गेलं तूपही गेलं
आता संदीप जोशी यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली आहे. जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणं जिकीरीचं जाईल. विधानपरिषदेची संधीही गेल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी थेट विधानसभा निवडणुकीचा पर्याय असू शकेल.

