शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीशीमुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीशीमुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब थेट राऊत यांच्या भेटीसाठी दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात आले असून या दोघांमध्ये ईडीच्या नोटीशीवरून बंददाराआड चर्चा सुरू आहे.
ईडीची नोटीस आल्यामुळे संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर राऊत यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या दोघांमध्येही ईडीच्याच अनुषंगाने चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर आज राऊत हे बॅकफूटवर असलेले पाहायला मिळाले. कालपर्यंत ईडीवर टीका करणारे राऊत आज ईडीचा आदर करत असल्याचं सांगत होते.
दरम्यान, राऊत मुख्यमंत्री भेटीनंतर अनिल परब हे सामना कार्यालयात आले आहेत. परब हे पेशाने वकील असल्याने ईडीला काय उत्तर द्यायचं? याविषयीच्या कायदेशीरबाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ईडीकडून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? त्यांना कसं सामोरे जायचं? यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येतं.
परब म्हणतात, प्रकरण माहीत नाही, चर्चा झालीच नाही
दरम्यान, अनिल परब यांनी ईडीच्या मुद्द्यावरून राऊत यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. ईडीचं प्रकरण मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर काहीही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या कामासाठी राऊत यांना भेटायला आलो होतो, असं सांगतानाच या प्रकरणावर पक्ष म्हणून आम्ही योग्यवेळी भूमिका जाहीर करू, असं परब यांनी स्पष्ट केलं.
राऊत आज काय म्हणाले होते?
ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं राऊत म्हणाले होते. हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

