दोन्ही पक्षातील जेष्ठ व्यक्तींच्या समजुतदारपणामुळे सादलगाव ग्रामपंचायत निवडणुक 50 वर्षापासूनच्या वादविवादाला पुर्णविराम देऊन बिनविरोध झाली.
शिरुर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सादलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र दोन्ही पक्षातील जेष्ठ व्यक्तींच्या समजुतदारपणामुळे सादलगाव ग्रामपंचायत निवडणुक 50 वर्षापासूनच्या वादविवादाला पुर्णविराम देऊन बिनविरोध झाली.
ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी एकूण 24 उमेदावारी अर्ज दाखल होते. त्यातील 15 उमेदवारांनी माघार घेऊन 9 उमेदवार बिनविरोध निवडून दिले. भाजपा 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा अशा पद्धतीने जागावाटप करुन दोन्ही पक्षांना समान सरपंच-उपसरपंच अडीज-अडीज वर्ष देऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली.
ग्रामपंचायत निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या इराद्याने गावातील प्रमुख जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी बसून जागावाटपाचे खलबते केल्यानंतर तब्बल 50 वर्षांचा पायंडा मोडीत काढत सादलगावची निवडणूक बिनविरोध करुन निवडणूक टाळण्यात यश आले आहे.
या बिनविरोध निवडीसाठी तब्बल चार बैठका घेतल्या मात्र त्या असफल झाल्या. आता निवडणुका लागणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना दोन्हीकडील कार्यकर्ते एकत्र येऊन की निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नऊ जागांसाठी तब्बल 24 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. शिरूर तालुक्यातील हे नावाजलेले गावात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार होता.
गावकी-भावकीच्या राजकारणात अनेक गट-तट निर्माण झाले होते. या गटा-तटामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद होते. अनेकदा सादलगावामध्ये टोकाची भांडणे देखील झाली. हा संघर्ष थांबवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा चंग गावाचील समजुतदार ज्येष्ठांनी बांधला. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांसोबत बसून घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात सादलगावच्या ग्रामपंचायतची चर्चा जोरात सुरु आहे.
राष्ट्रवादी प्रणित पॅनलचे बिनविरोध निवडून दिलेले उमेदवार
1) वैशाली दादासो होळकर, 2) खंडेराव पोपट मीठे , 3) कमल शिवाजी गायकवाड , 4) हरिआण्णा शंकर चांदगुडे, 5) विद्या किरण काशीद, 6) अश्विनी केसवड.
भाजप प्रणित पॅनलच्या एकूण बिनविरोध जागा
1) निर्मला दत्तात्रय केसवड, 2) मनीषा हनुमंत गावकवाड , 3) सुहास नामदेव दौंडे, 4) अविनाश अशोक शेलार, 5) विकास सुभाष पवार.

