भारत सरकारने या जोडप्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले, परंतु यूरोपमधील मानवी हक्क कायद्यामुळे प्रत्यार्पण होऊ शकले नाही.
लंडनः दीड कोटींच्या विम्यासाठी दत्तक मुलाच्या हत्येची खळबळजनक घटना ब्रिटनमध्ये घडलीय. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने भारतातून एका मुलाला दत्तक घेतले होते आणि त्यानंतर दीड कोटी रुपयांचा विमा मिळण्यासाठी त्याची हत्या केली. विशेष म्हणजे या जोडप्याला कायद्याचा कोणताही धाक नाही आणि ब्रिटनमध्ये मुक्तपणे फिरत आहे. भारत सरकारने या जोडप्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले, परंतु यूरोपमधील मानवी हक्क कायद्यामुळे प्रत्यार्पण होऊ शकले नाही.
डेली मेलच्या वृत्तानुसार, 55 वर्षीय आरती धीर आणि तिचा 31 वर्षीय पती कवल रायजादा हे ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळाचे माजी कर्मचारी आहेत. 2015 मध्ये गुजरातमधील मालिया हातिना गावातून गोपाळ सेजानी यांनी मुलाला दत्तक देण्याचे या जोडप्याने वचन दिले होते. दत्तक प्रक्रिया संपल्यानंतर काही दिवसांनंतर जोडप्यानं मुलासाठी ‘वेल्थ बिल्डर’ विमा पॉलिसी खरेदी केली. दत्तक घेतल्यानंतर दोन वर्षांनी 2017 मध्ये 11 वर्षांचा मुलगा गोपाळ आपल्या नातेवाईकांसह राजकोटला गेला होता. परत येत असताना गोपाळ आणि त्याच्या नातेवाईकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे गोपाळ आणि त्याचे नातेवाईक हरसुखभाई कर्दानी यांचा मृत्यू झाला.
या दाम्पत्याबरोबर फ्लॅट शेअर करणाऱ्या नितीश मुंड या व्यक्तीने कबूल केले की, कवल रायजादाने त्याला भारतात हत्येच्या योजनेसाठी पैसे दिले होते. नितीश मुंड सध्या तुरुंगात आहेत. त्याच वेळी ब्रिटनच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा अरबथनॉट यांनीही या प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे दृढ असल्याचे आपल्या निर्णयामध्ये म्हटले, ज्यावरून असे सूचित होते की, या जोडप्याने इतरांसह मिळून हा गुन्हा केलाय.
ब्रिटनचे खासदार टिम लुघटन यांनीही या जोडप्याला प्रश्न विचारला की, ” त्या मुलाच्या मारेकऱ्यांना ब्रिटनच्या रस्त्यावर मोकळेपणाने फिरताना आपल्याला पाहायचे आहे का?”, या जोडप्याने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत.

