आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी फोन करून आपण येत नसल्याची माहती त्यांनी दिली.
नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British Prime Minister Boris Johnsons) यांचा भारत (India) दौरा रद्द झाला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी फोन करून आपण येत नसल्याची माहती त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बोरिस यांनी भारत दौरा रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खरंतर, भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. 2021 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताचे निमंत्रण स्वीकारलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंबंधी माहिती दिली होती. पण आता ते येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
बोरिस जॉन्सन यांची भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील उपस्थिती दोन्ही देशांमधील नव्या संबंधाचं प्रतीक होतं, असं जयशंकर म्हणाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी होणाऱ्या जी-7 समिटमध्ये उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती.
बोरिस जॉन्सन सहावे ब्रिटीश व्यक्ती
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहणारे बोरिस जॉन्सन ब्रिटनचे सहावे प्रमुख व्यक्ती ठरणार होते. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. प्रिन्स फिलीप (1959), क्वीन इलिझाबेथ(दुसऱ्या) (1961), रॅप बटलर (1956), लॉर्ड लुईस माउँटबॅटन(1964) हे देखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहिले होते.
बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येणार होते. भारतसोबत व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात संबंध मजबूत करण्याचा जॉन्सन यांचा प्रयत्न होता. यूरोपीयन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर बोरिस जॉन्सन ग्लोबल ब्रिटन या ब्रँडचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळं आनंद झाल्याचे बोरिस जॉन्सन म्हणाले होते. पण कोरोनाच्या धोक्यामुळे हा दौरा रद्द झाला. खरंतर, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा सोहळादेखील मर्यादित स्वरुपात साजरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2020 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

