ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आर अश्विनच्या फिरकीचा चांगलाच बोलबाला राहिला.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आर अश्विनच्या फिरकीचा चांगलाच बोलबाला राहिला. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन अशा दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही अश्विनची फिरकी खेळण्यात अडचणी आल्या. अश्विनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची बॅट तळपली नाही. या दोन्ही बॅट्समनना अश्विनने 2-2 वेळा आऊट केलं. सिडनी कसोटीत आता डेव्हिड वॉर्नरविरोधात आर. अश्विनचं ‘मिशन 10 असणार आहे.
वॉर्नर आतापर्यंत 9 वेळा अश्विनची शिकार
डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे फिट नाहीय. तरीदेखील त्याला खेळवण्याचा विचार ऑस्ट्रेलियन संघ करत आहे. भारताचा विकेट टेकर फिरकीपटू आर. अश्विनने वॉर्नरला आतापर्यंत 9 वेळा बाद केलं आहे. आतापर्यंत अश्विनने वॉर्नर वगळता 9 वेळा दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनना आऊट केलेलं नाहीय. त्यामुळे सिडनी कसोटीत वॉर्नरला आऊट करुन वॉर्नरला दहाव्यांदा आऊट करण्याचा अश्विन प्रयत्न करेल.
टेस्ट सिरीजमध्ये सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन टेस्ट मॅचच्या 4 डावांमध्ये अश्विनने 10 विकेट्स मिळवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससोबत या सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमाकांवर आहे.
सिडनीत अश्विनचं मिशन 10 पूर्ण होणार?
अश्विनने वॉर्नरला आतापर्यंत भारतामध्ये 5 वेळा तर ऑस्ट्रेलियामध्ये 4 वेळा आऊट केलं आहे. भारतामध्ये अश्विनविरोधात वॉर्नरने 29.20 च्या सरासरीने 146 रन्स केले आहेत. तर ऑस्ट्रेलियात 5 डावांत 9 च्या सरासरीने केवळ 36 रन्स केले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतंय की ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर वॉर्नरला आऊट करणं अश्विनसाठी सोपं आहे.
दुसरीकडे सलामीवीर मयांक अग्रवालला हटवून, त्याच्या जागी नव्याने सामील झालेल्या रोहित शर्माला पाठवा. रोहित शर्मा सिडनीमध्ये शतक झळकावेल, असा विश्वास व्ही व्ही एस लक्ष्मणने व्यक्त केला. “ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी रोहित शर्मासाठी अनुकूल आहे. उपकर्णधार असलेला रोहित शर्मा नव्या चेंडूचा उत्तम सामना करतो. त्यामुळे सिडनीच्या मैदानात मोठी खेळी करुन तो शतक झळकावू शकतो”, असं लक्ष्मणने म्हटलं आहे.

