जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

0 झुंजार झेप न्युज

 ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले आहेत.

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अव्वल ठरली असून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी थेट काँग्रेसवरच रोख दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी हे विधान केलं. माझ्याकडेही प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे. 13, 295 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादीला 3 हजार 276 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 2 हजार 406, भाजप 2 हजार 942 आणि काँग्रेसला 1 हजार 938 जागा मिळाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं पाटील यांन सांगितलं. महाआघाडीने अनेक ठिकाणी एकत्रित मिळून निवडणुका लढवल्या. महाविकास आघाडीचं यश मोठं आहे. त्या तुलनेत भाजप 20 टक्केही नाही, भाजपचं अस्तित्व मर्यादित असल्याचं दिसून आलं आहे, असं सांगतानाच चिन्हावर निवडणूक लढवली जात नसताना भाजपकडून दावा केला जाणं योग्य नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुख्यमंत्र्यांची गाडी व्यवस्थित सुरू

राज्याचं स्टिअरिंग मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे. अनेक अडथळे आहेत. पण त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

टीआरपी घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा

पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यांच्याकडे संरक्षण संबंधातील एवढी माहिती बाहेर येणं हे धक्कादायक आहे. भाजप या प्रकरणी अर्णव यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच टीआरपी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणातील प्रत्येक गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. केंद्र सरकारने या घटनेला निरपेक्षपणे पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

तो काँग्रेसचा प्रश्न

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याला नवा विधानसभा अध्यक्ष लागेल. त्यावर काही चर्चा झाली का? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर, प्रदेशाध्यक्ष निवडीचा निर्णय ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर मी बोलणार नाही. परिस्थिती बदलली की त्यानुषंगाने निर्णय होत असतात, त्यामुळे आत्ताच काही बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.