बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; दिल्लीत सातव यांच्याशी खलबतं

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सामिल होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

 नवी दिल्ली: महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सामिल होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाल्याने त्यांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. थोरात कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्षपद सोडतील आणि नव्या प्रदेशाध्यक्षाची हायकमांडकडून घोषणा केली जाईल, अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

बाळासाहेब थोरात काल रविवारपासून दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी थोरात यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांना दिल्लीत बोलावलं गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. थोरात आज काँग्रेस नेते पवनकुमार बन्सल यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या कामाचा आढावा

सातव आणि थोरात यांच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामाचा आढावा घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. यावेळी किमान समान कार्यक्रमातील किती मुद्दे मार्गी लागले आणि कोणत्या मुद्द्यांवर काम सुरू आहे, याची माहिती घेण्यात आली. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने पक्षात नाराजी आहे, त्यावरही या दोघांच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चव्हाण की सातव?

थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर राज्यात कुणाला प्रदेशाध्यक्ष म्हणून पाठवायचे यावरही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येतं. या स्पर्धेत पृथ्वीराज चव्हाण आणि राजीव सातव यांची नावं आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर थोरात आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली. तसेच नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं. पण पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतंही पद देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. तर, दुसरीकडे सातव यांनीही प्रदेशाध्यक्षपदाचा घोडं दामटल्याने चव्हाण यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडते की सातव यांच्या हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काँग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक

थोरात राजीनाम्यावर ठाम असल्याने महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी उद्या मंगळवारी सकाळी काँग्रेसची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईचा अध्यक्ष बदलला म्हणून…

काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नुकतेच संघटनात्मक बदल केले होते. काँग्रेसने भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तसेच मुंबई कार्यकारिणीत बदल करण्यात आले. शिवाय मुंबई काँग्रेससाठी नव्या प्रभारीची नियुक्तीही करण्यात आली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यामुळे थोरात यांच्या दिल्ली भेटीकडे सर्वच राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.