आज या बाबू हरदास यांची जयंती आहे त्यांच्या या जंयती निमित्ताने बाबू हरदास यानां विनम्र अभिवादन
हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास (६ जानेवारी १९०४ - १२ जानेवारी १९३९) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, राजकारणी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम या अभिवादानाचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते.
बाबू हरदास यांचा जन्म नागपूरमधील कामठी येथे जानेवारी ६, १९०४ रोजी एका महार कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकून होते. बाबू हरदास यांची मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला.
त्या काळच्या प्रथांनुसार, वयाच्या सोळाव्या वर्षी, १९२० मध्ये बाबू हरदास यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला. बाबू हरदासांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच जानेवारी १२, १९३९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

