महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

0 झुंजार झेप न्युज

 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याची भाषा करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. 

बंगळुरु: बेळगावातील हुतात्मा दिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सीमाभागासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. या लढाईत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा ( b s yediyurapp ) यांनी उडी घेत मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही. निव्वळ राजकारणासाठी अशी उद्धव ठाकरे यांनी अशी वक्तव्य करणं बंद करावं, असे येडियुरप्पा यांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याची भाषा करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. संघराज्याच्या मुख्य तत्वांचे पालन आणि त्याबद्दलची कटिबद्धता राखणे गरजेचे असते. ती राखून उद्धव ठाकरे यांनी आपण खरे भारतीय असल्याचे दाखवून द्यावे, असेही येडियुरप्पा यांनी म्हटले. कर्नाटकमधील इतर नेत्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. बेळगाव आणि सीमाभागात कन्नडिगांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असे ठणकावून सांगितले होते. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बेळगावात आले होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांकडे भेटीसाठीची मागणी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.