राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी जाहीर कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी जाहीर कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विक्रम काळेंनी ही मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
मला आणि सतीश चव्हाणांना मंत्री करा: विक्रम काळे
विक्रम काळे यांनी भाजपचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली. सतीश चव्हाण किंवा मला मंत्रिपद देण्यात यावे. जर दोघांना मंत्रिपद देण्यात अडचण असेल तर सीनिअर म्हणून सतीश चव्हाणांना संधी देण्याची मागणी विक्रम काळे यांनी केली.
अडिच वर्षांचा फॉर्म्युला
विक्रम काळेंनी यावेळी बोलताना मंत्रिपदाबाबत आणखी एक फॉर्म्युला मांडला. दोघांना मंत्रिपद द्यायचं असेल तर अडीच वर्षे सतीश चव्हाण यांना आणि अडिच वर्ष मला संधी द्यावी, असं विक्रम काळे म्हणाले. विक्रम काळे शिक्षक मतदारसंघातून निवडून आल्यामुळे त्यांनी शिक्षण खाते देण्यात यावे अशी मागणी केली.
भाजपचा फॉर्म्युला
भाजपनं पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले चंद्रकांत पाटील यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद दिले होते. त्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनही पदवीधर आणि शिक्षक आमदारांना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली.
औरंगाबाद पदवीधर मतदारसघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल सतीश चव्हाण यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, अंकुशराव कदम, कैलास पाटील, औरंगाबादचे महापौर नंदू घोडेले, आयोजक राजेश करपे उपस्थित होते.
सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विधान परिषदेत
नोव्हेंबर डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विक्रमी मतांनी पराभव केला होता. विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं मोठी ताकद लावली होती. भाजपच्या राज्यातील प्रमुख नेते मराठवाड्यात जोरदार प्रचार केला होता. मात्र, सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपचे मनसुबे धुळीस मिळवले होते.

