आई बाळासाठी दूध गरम करायला जात असताना गॅस गळतीमुळे लायटर पेटवताच सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
नाशिक : सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने भीषण स्फोट होऊन नाशकात कुटुंब जखमी झालं. यामध्ये दोन वर्षांच्या लहानग्या बाळासह चौघा जणांचा समावेश आहे. दूध गरम करण्यासाठी लायटर पेटवला असता सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
नाशिकच्या खुटवडनगर परिसरात सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. आई बाळासाठी दूध गरम करायला स्वयंपाकघरात गेली. गॅस गळती झाल्यामुळे लायटर पेटवल्यानंतर सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये पगार कुटुंबातील एका लहान बाळासह चार जण जखमी झाले आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आग लागून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. स्फोटात घराचं मोठं नुकसान झालं आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
गॅस गिझर स्फोटाच्या आठवणी ताज्या
गॅस गिझर (gas geyser) फुटल्याने युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना तीनच दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सिडको परिसरात घडली होती. गौरव पाटील हा युवक शुक्रवारी (1 जानेवारी) दुपारी आंघोळ करत असताना हा प्रकार घडला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
गॅस गिझरचा स्फोट झाल्यानंतर गौरव गुदमरला होता. अचानक घडलेल्या या प्रकारमुळे त्याचे कुटुंबीयही घाबरले. त्यांनी तात्काळ बाथरुमकडे धाव घेत गौरवला बाहेर काढले. त्याला लगेच रुग्णालयात नेले जात होते, परंतु श्वास घेण्यास अधिक त्रास होऊन त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

