‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल: मुख्यमंत्री

0 झुंजार झेप न्युज

सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

पुणे: सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली, असंही ते म्हणाले.

या आगीमागे घातपात होता की अपघात होता, हे आताच सांगता येणार नाही. तसं बोलणंही योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही ते म्हणाले. या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हजारो कोटींचं नुकसान

या दुर्घटनेत लसीचं नुकसान झालेलं नाही. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लसीचं नुकसान झालं आहे. आगीत महत्त्वाच्या साहित्याचं नुकसान झालं आहे. पण सप्लाय लॉस झालेला नाही. मात्र हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी सांगितलं. भविष्यात आम्ही या इमारतीत कोरोनाची लस आणून ठेवणार होतो. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाचजणांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.