बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप

0 झुंजार झेप न्युज

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केलाय.

जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील असंही प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्या भेटीबाबत बोलताना लाड यांनी सांगितले की, राज यांच्याशी घरचे संबंध आहेत आणि ही सदिच्छा भेट होती. दरम्यान, येत्या 2-3 दिवसात काही गौप्यस्फोट होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई महापालिका भाजप ताकदीनं लढणार

मुंबई महापालिका निवडणूक भाजप ताकदीन लढणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व नेते खिंड लढवतील. यावेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली का? महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र दिसणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

धनंजय मुंडेंबाबत जे घडलं ते चुकीचं’

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, आता तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचं आहे. अशा प्रवृत्तींना चाप बसायला हवी. संबंधित महिलेची चौकशी झाली पाहिजे आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही लाड यांनी केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांना इशारा

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन प्रसाद लाड यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी इशारा दिला आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलाबाबतचं विधान ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी करायला हवं होतं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे काँग्रेसचं काम आहे. काँग्रेसची ही भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल थांबवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, MSEBच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशाराच लाड यांनी नितीन राऊतांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.