परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
मुंबई : दहावी आणि बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
“राज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु आहे. याबाबतचा सगळा विचार करून दहावी बारावी स्थानिक स्तरावर नियोजन केले जाईल. येत्या 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारीला या बैठकीत नियोजन करून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल,” असे बच्चू कडू म्हणाले.
“कोरोना हकलण्यात आम्हाला यश”
“विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा पुढील कॅबिनेटला घेणार आहोत. परीक्षा घेऊ त्यावेळी कोविड राहणार नाही. कोरोना हकलण्यात आम्हाला यश मिळालं आहे,” असेही बच्चू कडूंनी सांगितले.
“राज्यातील सगळ्या शाळा यांनी फी घेतल्या हे चुकीचे आहे. त्या पालकांना परत करण्याचा प्रयत्न करू,” असेही बच्चू कडू म्हणाले.
अभ्यासक्रम 50 टक्क्यांपर्यंत कमी करणे अशक्य – वर्षा गायकवाड
दरम्यान बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम 50 टक्क्यांपर्यंत कमी करणे अशक्य आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंञी वर्षा गायकवाड यांनी केले.
कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यंदा उशिराने सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ नसल्याने हा अभ्यासक्रम 50 टक्क्यांपर्यंत कमी करा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे. या मागणीबाबत शिक्षणमंञ्यांनी भूमिका स्पष्ट केली.
परीक्षेसाठी शिक्षण मंडळ गेल्या दोन एक महिन्यांपासून तयारी करीत आहे. यासाठी प्रश्नपत्रिकांची आखणी, छपाई ही कामे सुरू झाली आहेत. यापूर्वीच या अभ्यासक्रमात 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. अभ्यासक्रम आणखी कमी करणे शक्य नाही. त्यामुळे या घडीला अभ्यासक्रम कमी केल्यास नियोजन बिघडेल असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

