शिवसेनेच्या गडावर ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी, औरंगाबादमध्ये राजकीय गणितं बदलणार?

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचं पुनर्वसन सुरू आहे. याचाच भाग म्हणून पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलीय.

 औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचं पुनर्वसन सुरू आहे. याचाच भाग म्हणून पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलीय. स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संजय वाघचौरेंना नियुक्ती पत्र देत त्यांचं अभिनंदन केलंय

संदीपान भुमरे यांना शिवसेनेने मंत्रिपद दिल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही पक्षाबंधणी सुरू झालीय. विधानसभेला राष्ट्रवादीचे तिकीट हुकलेल्या संजय वाघचौरे यांना पक्षात नवी संधी देत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. वाघचौरे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलंच आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेच्या गडावर ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीने ही नवी खेळी केल्याचंही बोललं जातंय. नाराज कार्यकर्त्यांची मोठ्या पदावर वर्णी लावली जात असल्याने हे कार्यकर्ते पक्ष बांधणीच्या कामाला लागतील, अशी आशा राष्ट्रवादी पक्षाला आहे.


राष्ट्रवादी पक्षाने संजय वाघचौरेंना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटलं आहे, “महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपले सहकार्य राहीलअसा विश्वास आहे. आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन.”

दरम्यान, औरंगाबादमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीतून शिवसेनेने औरंगाबाद नामंतराचा विषय चांगलाच लावून धरलाय. यावरुन आघाडीत मतभेदही झाल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन रोखठोक भूमिका मांडलीय. यात भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी महाविकासआघाडी सरकारमधील मित्रपक्ष शिवसेनेवरही निशाणा साधलाय. मागील 5 वर्षे सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. हा भाजपचा ढोंगीपणाचा असल्याचा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तसेच शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना’ सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.