पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे,” असेही राणे म्हणाले.
मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. त्यांना ना खड्डे माहिती आहे, ना राज्याची तिजोरी माहिती आहे,” अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. “गाडी कशी चालवायची हे माहिती असेल, पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. अज्ञान आहे. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. पगार होत नाही, याला कारण उद्धव ठाकरे आहे,” असेही राणे म्हणाले.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला हवं, असे सांगितलं होते. पण साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं. उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवलं. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव करा, अशी हूल देत आहे. पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहे. कलेक्शन हे एककलमी कार्यक्रम आहे. हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही. मी सांगितलं तर सर्व फेल जातं. म्हणून मी काही सांगणार नाही,” असे राणेंनी सांगितले.
“…तर परिणाम गंभीर होतील”
“भाजपच्या कोणत्याही सदस्यांना फिरवायची ताकद महाविकासआघाडीत नाही. जर तसं झालं तर त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा इशारा नारायण राणेंनी दिला.
“वाढीव वीजबिल माफ करु असे बोलले होते. मात्र आता काहीही करत नाही. याबाबत लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. रस्त्यावर उतरुन काय होणार आहे?” असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला.
“शरद पवार सोडून बाकी सर्व नौटंकी”
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सरकारमध्ये आहेत. म्हणून मी शब्द वापरत नाही. पण शरद पवार सोडून बाकी नौटंकी आहे,” अशी खोचक टीकाही राणेंनी केली.
“मराठा आरक्षणाबद्दल तारीख पे तारीख दिली जात आहे. त्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. राज्यातील खड्डे बुजवत नाही. त्याला शिवसेना जबाबदार आहे. कोकणात काहीही केलं नाही,” असेही ते म्हणाले.

