राज्यात पहिल्यांदाच जेल टुरिझम सुरू करण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची आज घोषणा केली.
नागपूर: राज्यात पहिल्यांदाच जेल टुरिझम सुरू करण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची आज घोषणा केली. येत्या 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जेल टुरिझमचं उद्घाटन करण्यात येणार असून पुण्यातील प्रसिद्ध येरवडा तुरुंगापासून हे जेल टुरिझम सुरू होणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात येत्या 26 जानेवारीपासून येरवडा तुरुंगातून जेल पर्यटनास सुरुवात होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे त्याचं उद्घाटन करण्यात येईल. येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला होता, ती जागा, महात्मा गांधींना याच तुरुंगात ठेवलं होतं, नेहरूही याच तुरुंगात होते, या सर्व जागा पर्यटकांना दाखवण्यात येईल, असं देशमुख म्हणाले. येरवडा तुरुंग 500 एकरवर पसरलेला आहे. दीडशे वर्षे जुना हा तुरुंग आहे. त्यामुळे जेल पर्यटनमुळे कैद्यांना संसर्ग होण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
45 ठिकाणी 60 तुरुंग
राज्यात 45 ठिकाणी 60 तुरुंग आहेत. या तुरुंगांमध्ये एकूण 24 हजार कैदी आहेत. कोरोना संकटामुळे आपण साडे दहा हजार कैद्यांना पॅरोलवर सोडलं होतं. तर तीन हजार कैद्यांना शाळा, महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवलं होतं, असं सांगतानाच जेल टुरिझमच्या नव्या प्रयोगाला पर्यटक चांगला प्रतिसाद देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शुल्क किती?
जेल टुरिझमसाठी लहान मुलांना पाच रुपये, विद्यार्थ्यांना दहा रुपये आणि सामान्य नागरिकांना 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंग दाखवल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात इतर तुरुंगही दाखवण्यात येणार आहेत, असंही ते म्हणाले. (

