चंद्रकांतदादांच्या गावातच भाजपच्या ‘हाता’वर ‘घड्याळ’, शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती

0 झुंजार झेप न्युज

कोल्हापुरात खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले. 

 कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केली. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. 

चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेनेचा मेरु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आबिटकर गटाला रोखण्याचं आव्हान

वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चंद्रकांत पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली आहे.

प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार आहे.

“तर हिमालयात जाईन…”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता त्यांच्याच गावात शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करावी लागल्याने पुन्हा राजकीय धुरळा उडण्याची चिन्हं आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावागावात राजकीय धुरळा उडाला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील जनतेचं लक्ष आपापल्या गावातील निवडणुकांकडे लागलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.