EWS आरक्षण घेतल्यानं धोका होणार नाही?, खासदार संभाजीराजेंचा सवाल

0 झुंजार झेप न्युज

 EWS आरक्षण घेतल्यानं SEBC आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शक्यता संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक: मराठा समाजाला EWS आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरुन मराठा संघटना आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. EWS आरक्षण घेतल्यानं मराठा समाजाला धोका होणार नाही हे सरकारनं सांगावं असं आव्हान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.

EWS आरक्षण घेतल्यानं SEBC आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शक्यता संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. EWS आरक्षण हे सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. पहिल्या दिवसापासून मराठा समाजाने सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याचंही संभाजीराजे म्हणाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चांगला निर्णय अपेक्षित असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

OBC समाजात भीती निर्माण झाली हे खरं आहे. मात्र, OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आपण आजही वाट पाहत आहोत. पण अद्याप त्यांचा वेळ मिळाला नसल्याची खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

‘चव्हाणांची हकालपट्टी केल्यानं मार्ग निघणार नाही’

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्यावरुन अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि काही मराठा संघटनांनी केली आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करुन मार्ग निघणार नाही, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड!

आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.