त्यामुळे मुंबईकरांवरील कोरोनाचा धोका आणखी वाढल्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतील शहरातील कोरोना रुग्णदुप्पटीचा कालावधी आठवडाभरातच 186 दिवसांवरुन 97 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील कोरोनाचा धोका आणखी वाढल्याची शक्यता आहे.
मुंबईतील बेडच्या संख्येत वाढ
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका बेडच्या संख्येत वाढ करणार आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील खासगी आणि पालिका रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत 3500 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत खासगी आणि पालिका रुग्णालयातील बेडची संख्या 12500 हून पुन्हा 18 हजारांवर नेण्यात येणार आहे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तर उपनगरीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 791 बेड दोन दिवसात सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच येत्या दोन दिवसात रुग्णालयात 791 बेड्स सुरु करा, असे आदेश पालिकेने दिले आहेत.
रुग्ण दुपटीच्या कालवधीत घट
मुंबईतील शहरातील कोरोना रुग्णदुप्पटीचा कालावधी आठवडाभरातच 186 दिवसांवरुन 97 दिवसांवर आला आहे. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णसंख्येने आतापर्यंत सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईने साडेतीन हजारांचा टप्पा पार केला आहे.
मुंबई शहरातील नऊ उपनगरीय रुग्णालयात पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी या रुग्णालयांना दोन दिवसांत खाटा उपलब्ध करा, अशी सूचना पालिकेने दिली आहे. त्याशिवाय येत्या सोमवारपासून या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
मुंबईतील नव्या कोरोना रुग्णालयांची यादी
के.बी.भाभा रुग्णालय (वांद्रे)
स.का.पाटील रुग्णालय (मालाड
डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली शताब्दी)
भगवती रुग्णालय, के.बी. भाभा (कुर्ला)
माँ रुग्णालय (चेंबूर)
मदन मालवीय रुग्णालय (गोवंडी)
राजावाडी रुग्णालय (घाटकोपर)
एम.टी.अगरवाल (मुलुंड)

