बिहारची राजधानी पटणा येथे 15 प्रवाशांनी खच्चून भरलेली जीप गंगा नदीत कोसळल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
पटणा: बिहारची राजधानी पटणा येथे 15 प्रवाशांनी खच्चून भरलेली जीप गंगा नदीत कोसळल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 5 प्रवाशांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. तसेच मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे गंगा नदी परिसरात एकच गर्दी झाली असून परिसरात प्रचंड आक्रोश आणि रडारड सुरू झाली आहे.
15 प्रवाशांनी खच्चून भरलेली ही जीप पीपापूल येथे अचानक गंगा नदीत कोसळली. त्यामुळे दहा प्रवाशांना नदीत जलसमाधी मिळाली आहे. यातील काही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जीपमधील पाच प्रवासी बेपत्ता असून या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.
मृतांमध्ये दोन बालके
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमच्या सहाय्याने मदत कार्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी रमाकांत सिंह, गीता देवी, अरविंद सिंह, सरोजा देवी, आशिष, अनुराधा देवी यांच्यासह एका 12 वर्षीय मुलाचा आणि 14 वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. इतर लोकांचा शोध सुरुच आहे. पिकअप जीपही बाहेर काढण्यात आली आहे.
टपावर बसले म्हणून वाचले
या जीपमधून सर्वजण साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते. यावेळी पुलावर येताच जीपवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे या जीपने रेलिंगला जोरदार धडक देत थेट गंगा नदीत कोसळली. या जीपच्या टपावर बसलेल्या दोन तरुणांनी पाण्यात उडी मारून त्यांचा जीव वाचवला. या जीपमधील सर्वजण येथील अकिलपूर गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच पटणाच्या जिल्हाधिकाऱ्याने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

