'ऑक्‍सिजन'साठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने; जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला, दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

0 झुंजार झेप न्युज

ऑक्‍सिजनचा टँकर कुणाचा? सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद.सातारच्या सीमेवर ऑक्सिजन टँकर अडवला.

सातारा : सध्या देशात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला असून अनेक राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. वैद्यकीय उपचारांविना रुग्णांचे जीव जात आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. जिथं ऑक्सिजनवरुन दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला. ऑक्‍सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना साताऱ्याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली. 

तो टँकर सातारचा..ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन दिली. तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी TNS या कंपनीकडून स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात गतीनं ऑक्सिजन आणण्यासाठी आता एअरलिफ्टचा वापरराज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आणि गतीनं आणण्यासाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशीर होत आहे. विशाखापट्टणमहून ट्रेन येत आहे पण उशीर झाला आहे. आता ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार आहेत. एअरफोर्सच्या माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जाणार आहे. यामुळं ऑक्सिजन मिळण्यात गती प्राप्त होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  

आज पंतप्रधान मोदी यांनी ज्या राज्यात कोरोना रुग्ण जास्त आहे त्या राज्यांशी चर्चा केली. 9 ते 10 मुख्यमंत्री या कॉन्फरन्सला होते. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. ते म्हणाले की, ऑक्सिजन देताना आपली संख्या 7 लाख आहे त्यात 10 टक्के क्रिटिकल होतात. न्यायीक पद्धतीने मिळावं ही मागणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑक्सिजन,रेमडेसीविर आणि लस न्याय हक्काने मिळाली पाहिले. आपल्या संख्येनुसार मिळालं पाहिजे, असे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले असल्याचं देखील टोपेंनी सांगितलं. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.