या टोळीकडून 25 चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
वसई : वसई-विरार महापालिकेचे दोन कर्मचारी चक्क वाहनचोर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा 1 च्या पथकाने या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून 25 चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात वाहन चोरांचा धुमाकूळ
गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार, मीरा भाईंदर या शहरात वाहन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या शहरात दररोज सरासरी तीन वाहनं चोरीला जात असल्याची घटना समोर येत होती. या घटनेनंतर पोलिसांचे धाबे दणाणले होते. या तिन्ही ठिकाणी वाहन चोरांच्या वेगवेगळ्या टोळ्या सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 1 च्या पथकाने याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी पोलिसांनी तपास करुन या प्रकरणी तीन जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. योगेश उर्फ गॅनी मांगेला (36) हा या टोळीचा सूत्रधार आहे.
दोन जण महापालिकेचे कर्मचारी
त्याच्यासोबत कल्पक वैती आणि सचिन वैती या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. योगेश मांगेला आणि कल्पक वैती हे दोघेही वसई-विरार महापालिकेत कर्मचारी म्हणून काम करायचे. योगेश मांगेला हा औषध फवारणी विभागातील कर्मचारी होता. तर सचिन वैती हा घनकचरा विभागात काम करत असल्याचे सांगितले.
या चोरट्यांकडून एकूण 25 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात 20 ऍक्टिव्हा, 2 डिओ, 1 मेस्ट्रो, 1 युनिकॉर्न, 1 बजाज पल्सर या गाड्यांचा समावेश आहे. तसेच याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अद्याप या तिघांची चौकशी सुरु असून त्यांनी अजून गाड्या चोरल्या आहेत का? त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का? याची चौकशी सध्या सुरु आहे.

