त्यामुळे नागरिकांनी निदान आता तर गर्दी टाळून कोरोनापासून दूर झाले पाहिजे.
बीड : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका फटका बसत आहे. बीडच्या अंबाजोगाईत 30 जणांचा काल एका दिवसात मृत्यू झाला आहे. यातील 28 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. त्यामुळे कोरोनाचे हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे.
अंबाजोगाईत 30 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असले तरी मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. काल अंबाजोगाईत 30 जणांचा मृत्यू झाला. यातील 28 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तर दोन मृतांचा दफनविधी करण्यात आला. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बळीची संख्या वाढत चालल्याने भय इथले संपत नाही, अशीच परिस्थिती होत चालली आहे.
बीडच्या अंबाजोगाईत एकाच वेळी 28 जणांना अग्नीडाग दिल्याने स्मशानभूमी नि:शब्द होऊन हळहळ व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा अंबाजोगाईत असे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान आता तर गर्दी टाळून कोरोनापासून दूर झाले पाहिजे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची मोठी शक्यता आहे.
अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी
याआधीही अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.
राज्यभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अंत्यसंस्कार
कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलंय की राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

