या घटनेमुळे आता कोरोनाच्या उद्रेकामुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या संख्येमुळे आता पुण्यापाठोपाठ नाशिकमधील आरोग्ययंत्रणा कोलमडायला सुरुवात झाली आहे. नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना बेड, रेमेडीसीवर इंजेक्शन यांच्यानंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्याने जवळपास 30 रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या सहा रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. या घटनेमुळे आता कोरोनाच्या उद्रेकामुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन तुटवड्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेनं अधिग्रहित केलेल्या सुविचार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपला आणि अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याच रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आणी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची मोठी संख्या होती. तातडीनं या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हलवण्याची धावपळ सुरू झाली. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी धावपळ करून व्हेंटिलेतर वर असलेल्या 6 रुग्णांना इतरत्र हलवले.
नाशिक शहरामध्ये गुरवारी कोरोना रुग्ण संख्येने आत्तापर्यंतचे सर्व आकडे मागे टाकले असताना शहरांमध्ये बेड, रेमडिसिव्हर आणि लस यांचा तुटवडा तर आहेच. मात्र आता ऑक्सिजनचा देखील तुटवडा वाढल्याने नागरिकांनी जबाबदारी ओळखत प्रशासनाचं काम हलकं करावं अशी मागणी होते आहे.
नाशिकमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 19735
काल दिवसभरात एकूण मृत्यू – 11
नाशिकमध्ये दररोज साधारण 3500 ते 4000 चाचण्या
मृत्यू दर – 3 ते 3.5 टक्के
दर रोज लसीकरण – 5500- 6000
नाशिक मध्ये पॉझिटिव्हिटी रेट – साधारण 35%
लसीचा साठा – चार दिवस पुरेल इतका
लसीचा एकूण साठा – 189360
कोव्हीशिल्ड – 163100
कोव्हॅक्सीन – 26260
ऑक्सिजन साठा – अपुरा
पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’
राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण, सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

