राष्ट्रवादीने इथे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.
पंढरपूर : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांनी दोन दिवसात प्रचारसभांचा धडाका लावला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने इथे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र अजित पवारांनी स्वत: या निवडणूक प्रचारात उतरुन भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवारांनी आज भाजपाला आणखी एक धक्का दिला. पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि परिचारक गटाचे बांधकाम सभापती नगरसेवक सुरेश नेहतराव यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवेढा येथे हुलजंती येथील सभेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा पंढरपुरात तळ
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक भाजप आणि महा विकास आघाडीने निवडणूक राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची केली आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मूळ राष्ट्रवादीसाठी साधी सोपी वाटणारी लढत परिचारक आणि अवताडे गट एकत्रित आल्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यांनी पंढरपुरातील नेतेमंडळींची भेट घेऊन राजकीय रणनीती तयार करण्याचा प्रयत्न केला.
राजकारणामध्ये कुणी कुणाचे कायमचे शत्रू नसते याची परिस्थिती पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत येत आहे. पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. यासाठी सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष लक्ष दिले. मात्र भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची चाचपणी करत असताना कट्टर वैरी असणारे मोहिते-पाटील आणि परिचारक यांना एकत्र आणून समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान निर्माण केले.
मागील निवडणुकीतील चित्र
गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके यांना 89 हजार तर भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांना 74 हजार मते मिळाली होती. त्यावेळी समाधान आवताडेंनी मंगळवेढा तालुक्यात लीड घेत 54 हजार मते मिळवली होती. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये परिचारक आणि आवताडे एकत्र आल्यामुळे समाधान आवताडे सहज विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यात मोठे प्राबल्य आहे. तर आमदार प्रशांत परिचारक यांना मानणारा मोठा गट दोन्ही तालुक्यांमध्ये सक्रीय आहे.
आधी जयंत पाटील, आता अजित पवार
त्यामुळे आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन वेळा पंढरपूरचा दौरा केला. त्यानंतर आता अजित पवार हे 2 दिवसाच्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. मात्र अजित पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठीच पंढरपूर तालुक्यांमध्ये कल्याणराव काळे यांना आपल्या गटात घेत ताकद वाढवली आहे. त्याशिवाय लागोपाठ तीन सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवला आहे.
अजित पवारांच्या भेटीगाठी
अजित पवारांनी पंढरपुरात अनेक भेटीगाठी घेतल्या. शहरातील राजकीय घराणी असणाऱ्या धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांची भेट घेत धनगर समाजाला पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला. तर पोटनिवडणुकमध्ये कोणती भूमिका न घेणाऱ्या मनसे राज्य समन्वयक दिलीप धोत्रे यांच्याकडे पाहुणचार घेत राष्ट्रवादीला मदत करण्याचे आवाहन केले.
याशिवाय परिचारक गटात नाराज असणाऱ्या नगराध्यक्ष साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश भोसले यांची भेट घेत नवीन समीकरण बांधण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. तसेच आज जुने सहकारी असणारे सी पी बागल यांची भेट घेऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हे संपूर्ण चित्र पाहता अजित पवांरांनी या निवडणुकीत राजकीय कौशल्य पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.

