तामिळनाडूच्या शोगनूर मधील दलितांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
मुंबई दि. 9 - तामिळनाडू च्या राणीपेठ जिल्ह्यातील अरकोनम तालुक्यातील शोगनूर गावात जातीय द्वेषातून दलित वस्तीवर हल्ला करून 2 दलित युवकांची भीषण हत्या करुन 3 जणांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. दलितांवरील या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.अरकोनम मधील शेगनूर गावातील दलितांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ना.रामदास आठवले यांनी राणीपेठ जिल्हा पोलिस अधिक्षक शिवकुमार यांच्याशी तात्काळ संपर्क साधून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली.
तामिळनाडूत पी एम के हा पक्ष बहुतांश ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे.मात्र या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या पूर्वीही अनेकदा दलितांवर सामूहिक हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे या पुढे दलितांवर हल्ले होऊ नयेत यासाठी उपाय करतानाच दलितांवर हल्ला करणाऱ्या पी एम के च्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी ज्यामुळे पुन्हा दलितांवर हल्ला करण्यास कोणी धजावणार नाही अशी सूचना ना रामदास आठवले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली.
शेगनूर गावात दलितांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरां पैकी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शिवकुमार यांनी ना रामदास आठवले यांना दिली.

