देवेंद्र फडणवीस दिल्लीश्वरांना खूश करण्यातच व्यस्त; जयंत पाटलांची खोचक टीका

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा प्रचार करण्यासाठी बेळगावात आले आहेत.

बेळगाव: राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा प्रचार करण्यासाठी बेळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. फडणवीस हे दिल्लीश्वरांना खूश करण्यातच व्यस्त असतात, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शुभम शेळके यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना असेल, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.

मराठी माणसांची एकजूट कायम राहावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितलं.

शेळके पोटतिडकीने प्रश्न मांडतील

मराठी माणसांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली होती. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप मराठी माणसांसोबत नाही हे सिद्ध झाले

भाजप मागील पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम फडणवीस यांनी इथे येऊन केले आहे, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.