एकापाठोपाठ एक मृतदेह, सोलापुरातल्या स्मशानभूमीत राखेचा खच, मन सुन्न करणारं चित्र!

0 झुंजार झेप न्युज

मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर राख सावडण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे स्मशानभूमीत राखांचा आणि हाडांचा खच पडतोय.

सोलापूर : शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताहेत. परिणामी सरकारी हॉस्पिटल बरोबरच खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड्ची वाणवा भासू लागली असतानाच आता अंतिम संस्कारासाठी कोरोनाबाधित मृत देण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर राख सावडण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे तात्काळ दुसरे मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेत असल्यामुळे रुपाभवानी स्मशानभूमीत कोळसा राख आणि हाडांचा खच पडल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनामुळे दररोज वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू होत आहे. शहरातील कोरोना बाधित मृतदेहांवर रुपाभवानी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातात. कधीकधी ग्रामीण भागातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गाव दूर असेल तर त्याचाही अंतिम संस्कार सोपस्कार इथेच पार पाडले जातात. मात्र सध्या मृतदेहांची संख्या पाहिली तर स्मशानभूमीतील जागा अपुरी पडू लागल्याचं चित्र आहे.

अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी

रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी दोन मोठे शेड असून बाजूला तीन काटे आहेत. मात्र आता दिवसाला पंधरा ते वीस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे जागा अपुरी पडू लागली आहे.

कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं

याआधी सोलापूर शहरात चार ते पाच देहावर अंत्यसंस्कार केले जायचे त्यावेळी जागेची इतकी अडचण भासत नव्हती मात्र आता मात्र कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीत दहन करण्यासाठी जागेची अडचण निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे दोन दोन फुटांवर चिता जाळल्या जात आहेत.

उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली!

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत 16 तारखेला 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.