राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात येत्या तीन ते चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुंबई: राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात येत्या तीन ते चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लस केव्हा आणि कशी वापरायची याचा प्रोटोकॉल पाळल्या जात नसल्याने पॅनिक स्थिती निर्माण झाल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.
राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. रेमडेसिवीरबाबत आम्ही टेंडर मागविले आहेत. मात्र रेमडेसिवीरच्या किंमतीबाबत कंपन्यांचा गैरसमज झालेला आहे. आम्ही कमी किंमतीत रेमडेसिवीर खरेदी करणार नाही. आम्हाला कंपन्यांचं नुकसान करायचं नाही, असं शिंगणे यांनी सांगितलं. राज्यात रेमडेसिवीरचा साठा कमी असून येत्या 3-4 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा अधिकच जाणवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
गरज असेल तरच रेमडेसिवीर द्या
काही कंपन्यांनी राज्याला रेमडेसिवीरचा कमी पुरवठा केला. त्यामुळे खासगी रुग्णालयातही रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं सांगतानाच रेमडेसिवीर कधी आणि कसं वापरायचं याचा प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून ज्यांना गरज आहे, त्यांनाच हे इंजेक्शन द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात काल दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 59 हजार 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मृत्यांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला आहे.
मुंबईत 8 हजार नवे रुग्ण
मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्याही चिंताजनक बनली आहे. दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान मुंबई जिल्ह्यातील कोविड वाढीचा दर 1.64 टक्क्यांवर आला आहे.

