वृक्ष लागवड मोहिमेची यंत्रणांनी कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

0 झुंजार झेप न्युज

 वृक्ष लागवड मोहिमेची यंत्रणांनी कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

जालना, दि. 1 : जिल्ह्यात दिनांक 05 जुन, 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

कोरोना संसर्गजन्य महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून यामध्ये लाखो लोकांना लागण होऊन प्राण गमवावे लागले. यावर्षी कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजन अभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती करणारे वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे किमान तीन झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्याबाबत सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी निर्देश दिले असुन वृक्षलागवड कार्यक्रमांमध्ये जिल्हा व तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी सक्रियपणे सहभाग नोंदवून सदर कार्यक्रम राबविण्यात यावा. तसेच वृक्ष लागवड कार्यक्रम नगर परीषद हद्दीतील व ग्रामपंचायत हद्दीतील मोकळी जागा, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयातील मोकळी जागा इत्यादी ‍ठिकाणी वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करावे, असेही जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सांगितले.  

  जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं),जि.प.जालना, सर्व तहसीलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका यांची बैठक घेऊन प्रति व्यक्ती किमान तीन रोप लागवड करणेबाबत सर्वांना सूचना दिल्या असुन ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे पर्यवेक्षणाखाली सर्व ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण विभाग आणि वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच शहरी भागासाठी तहसिलदार व मुख्याधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली वृक्ष लागवडीसाठी सामाजीक वनीकरण विभाग व वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील. 

  सर्व नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी किमान एक घन वृक्ष लागवड म्हणजे मियावाकी करणे बंधनकारक असून रस्ता दुतर्फा नदीनाले यांच्या बाजूला सार्वजनिक विहिरी जवळ शेतीच्या बांधावर पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात यावे. तसेच वृक्ष लागवड 2021 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकारी यांची तालुकानिहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे. नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सर्व यंत्रणाची बैठक घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

5 जुन रोजी वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिनाचा शुभारंभ - उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री परळीकर

विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार वृक्षलागवड मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांचे सर्व अधिकारी कर्मचारी ,वृक्षप्रेमी , एनजीओ या सर्वांचाच सक्रिय सहभाग असणार आहे. जालना जिल्हयात वृक्षलागवड 2021 या कार्यक्रमाचा दिनांक ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनी रोपे लावून शुभारंभ केला जाणार आहे.

वृक्षलागवड मोहिमेत गावातील ग्रामस्थ व नागरीक व यांचेबरोबर लोकप्रतीनिधी, पदाधिकारी, शासकीय विभाग, निमशासकीय कार्यालय, अशासकीय संस्था, इतर संस्था, शाळा, महाविदयालय, पर्यावरण तज्ञ अशा सर्व घटकांनी सहभाग नोंदवुन, तसेच कोविड -19 च्या निर्देशाचेही पालन करुन मोठया प्रमाणात वृक्षारोपण करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) जालना रविंद्र परळीकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.