‘नैतिकता शिल्लक असेल तर महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’ फडणवीसांचं आव्हान

0 झुंजार झेप न्युज

‘नैतिकता शिल्लक असेल तर महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’ फडणवीसांचं आव्हान 

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यात विविध ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा हा ढोंगीपणा आहे. राज्य सरकारनं आधी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, असं आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केलंय. 

‘महाविकास आघाडी प्रायोजिक आजच्या बंदमध्ये मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झाला. हे पूर्णपणे ढोंगी सरकार. लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रात बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात. हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजार आणि 50 हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटं आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. त्यांच्या घटकपक्षातील लोकही म्हणतात, पूर्वीचं भाजप सरकार मदत करत होतं, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय, ते मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहेत, मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल फडणवीस यांनी केलाय.

सरकार पुरस्कृत बंद, फडणवीसांचा आरोप

लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्यावर कारवाई करत आहे. आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्यासाठी नाही, पण राजकीय पोळी भाजता येईल का, या संकुचित विचाराने केलेला हा बंद आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही, पण प्रशासनाची दमदाटी, पोलिसांची दमदाटी करुन, जीएसटी, यांचा वापर करुन बंद केला जात आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

‘नैतिकता शिल्लक असेल तर शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’

‘या सरकारचं नाव बंद सरकार आहे, हे सत्तेत आल्यानंतर यांनी योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश उघडा होता, महाराष्ट्र बंद केला, आमचे छोटे दुकानदार, व्यावसायिक यांचे गाडे रुळावर येत असताना सरकारने बंद केला. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोजून दहा कार्यकर्ते हायवे रोखतात आणि पोलीस तमाशा बघतात, कारवाई करत नाहीत. एकूणच सरकार स्पॉर्नर दहशतवाद सुरु आहे. या सरकारला थोडी नैतिकता असेल तर महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल’, असं आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.