वाचनालय व व्यायामशाळा उभारुन साकारणार शहीद निलेश धांडे यांचे स्मारक-पालकमंत्री ना. बच्चू कडू

0 झुंजार झेप न्युज

वाचनालय व व्यायामशाळा उभारुन साकारणार शहीद निलेश धांडे यांचे स्मारक-पालकमंत्री ना. बच्चू कडू 

अकोला,दि.12 : देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणे ही सोपी गोष्ट नाही. ज्याने देशाला सर्वस्व दिले त्याला आपण काय देणार. शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या बलिदान भावनेचा आदर करणे आवश्यक आहे. युवा पिढी पुढे त्यांचे आदर्श सतत सामोरे ठेवले पाहिजे. त्यासाठी वरुर जऊळका गावात एक चांगले वाचनालय व व्यायामशाळा उभारुन शहीद निलेश धांडे यांचे स्मारक साकारले जाईल, जेणेकरुन चांगली मने व बलदंड शरीराचे युवक देशासाठी घडले पाहिजे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वरुर जऊळका येथे सोमवारी (दि.११) केले.

 वरुर जऊळका ता. अकोट येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांच्या श्रद्धांजली सभेस पालकमंत्री ना. कडू संबोधित करत होते. यावेळी ना. कडू यांनी शहीद धांडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ही घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, रवी ढोके तसेच धांडे कुटुंबीय व शहीद निलेश यांचे आई वडील उपस्थित होते.

 येथील गजानन मंदिराच्या सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने स्व.निलेश यांच्या पत्नीला सेवेत घेण्यात यावे तसेच शहीद निलेश यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांना संबोधित करतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, मृत्यू मृत्यूत फरक असतो. देशासाठी बलिदान करत आलेलं वीर मरण सर्वात श्रेष्ठ. एक दिवसाची श्रद्धांजली वाहण्यापेक्षा शहीदांनी केलेल्या त्याग व बलिदानाचा आदर करण्याची भावना आयुष्यभर जपली पाहिजे. वेगवेगळ्या झेंड्यांसाठी लढण्यापेक्षा देशाच्या तिरंग्यासाठी एकजूट होणे आवश्यक. प्रत्येक तरुणाने, नागरिकाने देशप्रेमाची भावना जागवली पाहिजे. आपल्या देशाचा माणूस सुखी व्हावा, सुरक्षीत रहावा म्हणून निलेश धांडे हे शहीद झाले. त्यांच्याप्रमाणे देशासाठी त्याग मनोभावना युवकांमध्ये तयार झाली पाहिजे, त्यासाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व उत्तम वाचनालय याठिकाणी उभारु, तेच शहीद निलेश धांडे यांचे यथोचित स्मारक होईल. शहीद निलेश धांडे यांच्या परिवाराला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेलंच. मात्र, ज्याने देशाला देह दिला त्याला काही देणारे तुम्ही आम्ही कोण? असा परखड सवाल त्यांनी केला. इमानदारी, बलिदान आणि कर्तृत्व यानेच माणूस मोठा होतो. शहीदांच्या कुटुंबियांना सन्मान द्या. शहीदांचा सन्मान म्हणून व्यसनांचा त्याग करा. शहीदांचा सन्मान म्हणून गावात एकजूट झाली पाहिजे. त्यातून गावाच्या विकासासाठी करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प करावा,असे मत ना. कडू यांनी यावेळी मांडले.

यावेळी ना. कडू हे स्वतः शहीद निलेश धांडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. त्यांचे सांत्वन केले. शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन २०१३ पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.