• कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लसीकरणाबाबत जनसामान्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करा-पालकमंत्री राजेश टोपे
जालना,दि.9 : अमेरिकन इंडियन फाउंडेशन यांच्यावतीने जालना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या "मिशन कोरोना विजय" या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग तसेच असंघटित कामगारांमध्ये लसीकरणाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याचे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड, राज्य आरोग्य व शिक्षण व विभागाचे उपसंचालक विजय बाविस्कर , अमेरीकन इंडिया फाॅउंडेशनचे राष्टीय प्रमुख मॅथ्यू जोसेफ,डाॅ.महेश श्रीनिवास , डाॅ.रजतरंजन, डाॅ. आशिष साळुंके , श्रीमती श्रेया रली ,श्रीमती शैलेजा प्रधान , जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अर्चना भोसले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले अमेरिकन इंडियन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्रातील जालना पुणे औरंगाबाद आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत जनमानसामध्ये जनजागृती करण्यासाठी "मिशन कोरोना विजय" हा उपक्रम सुरू केला आहे. यापूर्वीही या संस्थेमार्फत आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविण्यात आले असल्याचे सांगत जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक दिव्यांग तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये लसीकरणाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले
कोरोना या साथीच्या आजाराला नियंत्रित आणत असताना महाराष्ट्र शासनाच्या सोबत विविध स्वयंसेवी संघटना आणि विविध विभागांची मोलाची मदत झाली असल्याचे सांगत राज्याला आणि देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांकडून मदतीचा हात पुढे सरसावले आहेत. येणाऱ्या दसरा महोत्सवापर्यंत संपूर्ण देशभरात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यही या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये मागे राहू नये यासाठी 8 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान संपूर्ण राज्यभरात "मिशन कवच कुंडल" ही मोहीम राबविण्यात येत आहे. दर दिवशी पंधरा ते वीस लक्ष नागरिकांचे लसीकरण होईल या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
सर्वप्रथम "मिशन कोरोना विजय" या उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वाहनास हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
