•30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी
•गाव, वॉर्ड व मोहल्लानिहाय लसीकरणाचे काटेकोर नियोजन करा
•व्हॅक्सिनेशन ऑन डिमांड संकल्पना राबवा
जालना,दि.3 : कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना लसीचा पहिला डोस 100 टक्के देण्याच्यादृष्टीने गाव, वॉर्ड व मोहल्लानिहाय लसीकरणाचे सुक्ष्म व काटोकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
कोव्हीड19 च्या अनुषंगाने लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती चिमंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यात येत आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी प्रत्येक गाव व शहरी भागांच्या वॉर्डनिहाय याद्या उपलब्ध करुन घेण्यात याव्यात. ज्या नागरिकांचे लसीकरण प्रलंबित राहिले आहे अशा नागरिकांची माहिती संकलित करुन त्यांचे लसीकरण पुर्ण करण्यात यावे. पहिला डोस देण्यासाठी नियोजन करत असतानाच ज्या नागरिकांचा लसीचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांचेही प्राधान्याने लसीकरण पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.
लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या
ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये प्रत्येक नागरिकाला लसीचा डोस देण्यासाठी सरपंच, नगरसेवक यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची मदत घेण्यात येऊन जनमानसांमध्ये लसीच्या उपयुक्ततेबाबत जागृती करत त्यांना लसीकरण केंद्रावर आणुन त्यांना लस टोचण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.
व्हॅक्सिनेशन ऑन डिमांड
शहरी व ग्रामीण भागांमध्ये एखादी स्वयंसेवी व सामाजिक संस्था 100 पेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणासाठी एकत्र करुन लस देण्यासाठी पुढाकार घेत असतील अशा संस्थेच्या मागणीनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात यावे. सत्राचे नियोजन करत असताना नागरिकांना या लसीकरण सत्राची माहिती दोन दिवस आधी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
गाव व वॉर्डनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा
लसीकरणामध्ये कुठलेही गाव व शहर मागे राहू नये तसेच लसीकरणाचे दिलेले उद्दिष्ट पुर्ण होण्याच्यादृष्टीने प्रत्येक गाव व वॉर्डनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नोडल अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविका, आशावर्कर, शिक्षक यांच्या मदतीने गाव व वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन लसीचा डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करत या नागरिकांना प्राधान्याने लसीचा डोस देण्याबरोबरच ज्या गावांनी 100 टक्के लसीकरण पुर्ण केले आहे अशा गावांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण पुर्ण करा
24 सप्टेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनानुसार विविध दुकाने, हॉटेल यासह खासगी आस्थापनांमध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाचे लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यांमध्ये ज्या दुकाने, हॉटेल यासह खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले नसतील अशा आस्थापना बंद करण्याची कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
