उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्ये गंभीरपणे घेऊन योग्य निर्णय घेण्याची गरज
मुंबई : शिवसेना(उबाठा) गटाने व स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्ये गंभीरपणे घेऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.2009ला मनसे फँक्टरमुळे तात्कालीन शिवसेना व भाजपाच्या जागा घटल्या होत्या. परंतु 2014च्या निवडणुकीत मनसे फँक्टर निष्क्रिय झाला व सेना-भाजपा यूतीचे नुकसान करु शकला नाही.तर 2014च्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नुकसान झाले. राष्ट्रवादीचे तर जास्तच झाले.परंतु 2019ला वंचितचा प्रभाव कमी झालेला वाटला. हे पाहता 2024ला वंचित चा प्रभाव राहणार नाही असे वाटते..
भाजपा नको हे कर्नाटकातील मतदारांनी ठरवले होते. परंतु देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) ला मत देऊन मत वाया घालवण्यापेक्षा भाजपा-कॉंग्रेस अशी लढत आहे हे मतदारांनी लक्षात घेतले आणि थेट भाजपाच्या विरोधात आणि कॉंग्रेसच्या पारड्यात दान टाकले.महाराष्ट्रात येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या वेळी मतदारांची हीच मानसिकता असणार आहे.महाराष्ट्रात भाजपा-शिंदे गट विरुद्ध मविआ (सेना उबाठा-कॉंग्रेस-राष्ट्रवादी) अशीच लढत होणार आहे.
मविआ सरकार ज्या पद्धतीने घालवले त्याबद्दल मतदारांच्या मनात प्रचंड चीड आहे. उद्धव ठाकरे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार आहेत. नुसते शिवसैनिक नव्हे तर जनता पण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. राहूल गांधींच्या पदयात्रेने आणि कर्नाटकातील विजयाने मरणप्राय झालेल्या कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकलं गेलंय. ईडी-सीबीआयच्या कारवायांमुळे, दडपशाहीमुळे त्रस्त असलेल्या राष्ट्रवादीला लढायचे बळ दिलंय.त्यातच मतदार फक्त मतदानाच्या संधीची आणि वेळेची वाट पाहतोय. सबब भाजपाला महाराष्ट्रात दारूण पराभव खुणावत आहे.मविआ एकजुटीने, एकदिलाने एकास एक लढत लढली तर भाजपा-शिंदे गट लोकसभेत एक अंकी जागेवर तर विधानसभेत दोन अंकी संख्येवर येईल. म्हणून कमळाबाई प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मविआत बिघाडी करायचा प्रयत्न करत आहे असे वाटते.

