पर्पल जल्लोषमध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांवर विचारमंथन

0 झुंजार झेप न्युज

तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन, सूचवण्यात आले विविध उपाय 

पिंपरी चिंचवड,दि.17: पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्पल जल्लोष कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांवरील चर्चासत्रात दिव्यांगांच्या प्रश्नावर विचारमंथन करण्यात आले. यामध्ये दिव्यांगांचे केवळ प्रश्नच मांडण्यात आले नाही, तर त्यावर उपाय देखील सूचवण्यात आले आहेत. या चर्चासत्रात दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, संघटना सहभागी झाले होते.  

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्‍लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात पार पडलेल्या चर्चासत्रात ‘अडथळामुक्त प्रवेश - दिव्यांग व्यक्तींसाठी तयार केलेले वातावरण उत्पादन’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये युनिसेफचे संजय सिंह, वॉटर ऍड संस्थेचे प्रकल्प अधिकारी पूर्णा मोहंती, एस.एसी.आर.ई.डी. संस्थेचे वरिष्ठ अभियंता अनिल त्रिवेदी यांनी मार्गदर्शन केले. तर, या चर्चासत्राचे सूत्रसंचालन स्वच्छता दूत युसूफ कबीर यांनी केले. 

यावेळी आयुक्त शेखर सिंह,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, दिव्यांग भवन फाउंडेशन चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

पूर्णा मोहंती यांनी दिव्यांग बांधवांसाठी सर्व ठिकाणी सहज प्रवेश उपलब्ध कसा होईल, या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांना सहज प्रवेश उपलब्ध करून देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे ही ते म्हणाले. सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ व दिव्यांग बांधवाना जाता येईल, असे बनवल्यास दिव्यांग बांधवाना तेथे सहज प्रवेश करता येईल. तरच सर्वाना समान अधिकार मिळेल, असेही ते म्हणाले. 

अनिल त्रिवेदी म्हणाले की, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे नियम असणे आवश्यक आहे. यासाठी बाला बिल्डिंग संकल्पना उपयुक्त आहे. अंगणवाडी साठी मोकळे मैदान असणे गरजेचे आहे. यावेळी राज्यातील अंगणवाड्यामध्ये दिव्यांगांना सहज प्रवेश उपलब्ध होईल, असे वातावरण बनवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या चर्चा सत्रासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

युडीआयडी कार्ड का आहे महत्त्वाचे? 

पर्पल जल्लोषमध्ये ‘युडीआयडी दिव्यांग सर्वेक्षण, बालवाडी प्रकल्पाच्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे सादरीकरण’ या विषयावर देखील सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मित्र स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत, भाषा तज्ज्ञ समृद्धी कुलकर्णी, प्रहार संघटना पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष राजेंद्र वाकचोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यांनी केले. यावेळी बोलताना अभिजित राऊत यांनी युडीआयडी कार्ड संबंधित माहिती दिली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग कार्ड वाटप करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

समृद्धी कुलकर्णी म्हणाल्या की, ‘पुणे शहरात आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन दिव्यांग सर्वे केला. लहान दिव्यांग बालकांना औंध दवाखान्यात मोफत उपचार सुरु केले,’ अशी माहिती दिली. राजेंद्र वाकचौरे म्हणाले की ‘दिव्यांगांना शासनाच्या योजना मिळविण्यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य केले आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात दिव्यांग सर्वे करणे गरजेचे आहे. जन्मत: दिव्यांग असणाऱ्याना प्रथम प्राधान्य द्या नंतर अपघाती दिव्यगत्व आलेल्या नागरिकांना प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.