डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १२०० विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित

0 झुंजार झेप न्युज

संगीताच्या सूरबद्ध लयीवर विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

पुणे,दि.21: पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२०० विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सुमधूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि इंडिया वर्ल्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली उच्च कोटीची कलाकौशल्ये सादर करीत अवघ्या १५० मिनिटांमध्ये प्राचीन ते आधुनिक प्रकारच्या ३० योगाची प्रत्यक्षिके सादर करीत उपस्थितांची अक्षरशः मने जिंकून घेतली. या कार्यक्रमात पालकांच्या लयबद्ध ढोलताशा वादनाने आणखी उत्साह भरण्याचे काम केले, तसेच हजारो उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत जोरदार जल्लोष केला.

कार्यक्रमाला डी. ई. एस. च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, या विश्वविक्रम उपक्रमाचे सल्लागार डॉ. मिलिंद संपगावकर, खेमराज रणपिसे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे, सिमरन गुजर, ग्रेसी डिसूझा यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करवून घेत विश्वविक्रमात आपला मोठा हातभार लावला.

शनिवारी सायंकाळी दीपप्रज्वलन आणि कर्णमधूर अशा शंखनादाने या योगा विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि आधुनिक पोषाखांमध्ये येऊन विविध प्रकारे योगासने उपस्थितांसमोर प्रस्तुत केली. भक्तगीत, भावगीत, चित्रपट गीत-संगीताच्या लयबद्ध चालीवर विद्यार्थ्यांनी आपली गुणकौशल्ये सादर केली. योगा विश्वविक्रमात विद्यार्थ्यांनी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

विद्यार्थ्यांनी शिक्षक व तज्ज्ञांच्या कुशल मार्गदर्शनात अंडरवाॅटर योगा तसेच स्केटिंग योगा केले होते, त्याची व्हिडिओ क्लिप या वेळी दाखवण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.