⟩ सीसीटीव्ही यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन
⟩ राज्यातील 50 हजार पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना घरे उपलब्ध होणार
वर्धा,दि.26: राज्यातील प्रत्येक नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावे, व गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेणे व ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्वाची भुमिका बजावणार आहे. यामुळे वर्धेतील गुन्हेगारी सोबतच, अतिक्रम, विस्कळीत वाहतुकीस आळा बसून वर्धेची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज वर्धा पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
वर्धा येथील शहरामध्ये 22 जागेवर 93 व हिंगणघाट शहरातील 14 जागेवर 59 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आज वर्धा येथील या प्रकल्पाचे उद्घाटन ना. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी. नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे, सुनील गफाट, वर्धा, पुलगाव, आर्वी व हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात वर्धा व हिंगणघाट शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प सुरु करण्यात आला असून दुस-या टप्प्यात देवळी, पुलगाव, आर्वी व सेलू येथेही सीसीटीव्ही प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असतात. यासाठी राज्य शासन पोलीसांच्या सदैव पाठीशी राहणार आहे. यासाठी राज्यातील 50 हजार पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस नेहमी तणावात काम करीत असतात यासाठी त्यांच्या समस्या अडअडचीचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात वर्धा येथून आज होत आहे. राज्यात 28 फॉरेन्सिक लॅब मोबाईल व्हॅन उपलब्ध होणार असल्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास मदत होईल असे डॉ. पंकज भोयर म्हणाले.
सीसीटीव्ही प्रकल्पामुळे पोलीसांना गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटविण्यास मदत होणार आहे. पोलीस प्रशासनानी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील लोकसंख्येने प्रमाण जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात सुध्दा सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्याची आवश्यक असल्याचे आमदार समीर कुणावार म्हणाले. या प्रकल्पातील सीसीटीव्ही सोबतच शहरातील व्यवसायांना सीसीटीव्ही जोडणे आवश्क आहे असेही श्री. कुणावार म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, दिलीप भुजबळ पाटील यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पुवी मान्यवरांचे हस्ते सीसीटीव्ही कॅमेराचे कमांड नियंत्रण कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी पोलीस विभागातील उत्कृष्ठ कामगिरी करणा-या पोलीस अधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर कवडे यांनी तर आभार पुंडलिक भटकर यांनी मानले.

